गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने अनेकाना विजयाचा मार्ग मोदींनी दाखविला होता. मतदारांनी मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी डोळे झाकून भाजपच्या उमेदवारांना मत दिले. मोदींच्या चमत्काराने अनेकांच्या नावापुढे खासदार -आमदार अशी बिरुदावली लागली. त्या चमत्काराची पुनरावृत्ती येत्या लोकसभा निवडणुकीत होईल, अशी भाबडी आशा बाळगून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाटेचा ज्वर होता. त्यामुळे पक्षाने जो उमेदवार दिला त्याला मतदान करीत मतदारांनी मोदींना पंतप्रधानपदी विराजमान केले. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, अनेक योजनांवर प्रश्नचिन्ह लागले, महागाई कमी झालेली नाही अशा परिस्थितीत काँग्रेससह विरोधी पक्षानी उठविलेले रान मोदी लाटेला निष्प्रभ करते की काय असे वाटू लागले होते. मात्र पुलवामा हल्ल्याने सारे राजकीय गणित बिघडवून टाकले. राफेल घोटाळ्याची चर्चाही मागे पडली. देशात देशभक्तीचा ज्वर टिपेला पोहोचला आहे. पाकिस्तान वर केलेली सर्जिकल स्ट्राइक आणि हवाई हल्ला अनेकांची राजकीय उड्डाणे यशस्वी करणार यात शंका नाही.
औरंगाबाद आणि जालना या दोन मतदार संघाचा विचार केला तर येथील परंपरागत मतदार मोदींच्या बाजूने कौल देईल असे दिसते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मिळाली की विजय पक्का असाच समज उमेदवारांनी केलेला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर महिनाभरापूर्वीच 'मोदी हे तो मुमकिन है' असे सांगून टाकले. भाजपला केन प्रकारे मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करावयाचे असल्याने त्यांना मला निवडून आणणे भागच आहे, असे गणित त्यांनी मांडले. त्यामुळे खैरे यावेळीही मोदी चमत्काराच्या आशेवर आहेत, यात शंका नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही मोदी चमत्काराचा आधार वाटतो आहे. मंत्री खोतकर यांचे बंड मोडून काढल्यानंतर आता आपला लोकसभेचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी खासगीत बोलताना सांगितले. जालन्यात काँग्रेसकडे चेहरा नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचे फारसे सख्य नाही याचा फायदा आपल्याला होईल असे दानवे म्हणाले. तर नाराज शिवसैनिकांचीही अखेरच्या क्षणी आपण समजूत काढु असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अहो, विकासाचे बोला...
उमेदवारांनी स्वकर्तुत्वाने निवडणुका लढवाव्या आणि जिंकाव्या यावर आता त्यांना स्वतःलाच विश्वास उरलेला नाही. मग मोदींनीच लढावे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने पारदर्शक कारभार केला. त्याचा लाभ युतीच्या प्रत्येक उमेदवाराला होणार आहे. म्हणून या लोकप्रतिनिधींनी विकास कामे करायची नाही का, असा प्रश्न पडला आहे. गेल्या वीस वर्षात औरंगाबाद आणि जालना मतदारसंघाचा किती विकास झाला याचे उत्तर दानवे -खैरे यांनी मतदारांना द्यावे. स्वतःच्या कार्यक्षमतेवरच निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी करायला हवी. जिल्ह्यात किती योजना आणल्या, किती कोटी रुपये विकास कामावर खर्च केले, भविष्यातील योजना कोणत्या, कशा पद्धतीने विकास करणार याची यादीच मतदारांपुढे ठेवायला हवी. 'मोदी है तो मुमकिन है' असा नारा देत आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो हेही ध्यानात घ्यायला हवे. मतदार आता डोळे झाकून मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही. मोदी लाटेच्या आशेवर असलेल्यांनी यावर विचार करायला हवा.